मराठीबोली शाळेचा इतिहास
मराठी भाषा – ओळख
मराठी ही इंडो-आर्यन भाषासमूहातील एक प्रमुख भाषा आहे. ही मुख्यतः महाराष्ट्र राज्यात बोलली जाते आणि महाराष्ट्राची अधिकृत भाषा आहे. सुमारे ८३ दशलक्ष लोकांची मातृभाषा असलेल्या मराठीचा भारतात भाषिक दृष्टिकोनातून चौथा क्रमांक लागतो. महाराष्ट्र बरोबर गोवा , मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, तेलंगणा, आंध्रप्रदेश या राज्यात तसेच दिल्ली, बंगळूर, चेन्नई, कोलकाता या मोठ्या शहरांमध्ये शिक्षण, नोकरी, उद्योगधंद्यासाठी गेलेले मराठी भाषिक राहतात.
मराठी भाषेचा इतिहास
मराठी भाषेचा उगम संस्कृत आणि प्राकृत भाषांपासून झाला आहे. मराठीचे मूळ ‘महाराष्ट्र प्राकृत’ मध्ये आहे. सातवाहन काळात (ई.स.पू. २रे शतक) या भाषेची पायाभरणी झाली होती. ११व्या शतकात ‘संत नामदेव’, ‘संत ज्ञानेश्वर’ यांच्यामुळे मराठीला साहित्यिक ओळख मिळाली. ज्ञानेश्वरांनी ‘भावार्थ दीपिका’ (ज्ञानेश्वरी) लिहून संस्कृत भाषेतील ‘भगवद्गीता’ सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. संत तुकाराम, एकनाथ, जनाबाई आदी संतांनी अभंग, ओवी, भारुड या प्रकारांतून जनसामान्यांमध्ये अध्यात्म व सामाजिक जाणीवा निर्माण केल्या. मराठ्यांच्या उदयासोबत विशेष छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेल्या राजआश्रयामुळे मराठी भाषेचा प्रशासकीय वापर वाढला. बखर लेखन आणि शाही पत्रव्यवहार मराठीतून होत असे.
आधुनिक मराठी भाषेचा विकास
१९व्या शतकात इंग्रजी शिक्षणप्रणाली सुरू झाल्याने आधुनिक मराठी गद्याचा आरंभ झाला.बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजसुधारणेच्या चळवळीतून मराठीला बळ दिले. पद्मश्री पु.ल. देशपांडे, वि.स. खांडेकर, वि.वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), शं.ना. नवरे यांनी विविध साहित्यप्रकारात योगदान दिले. सध्या मराठी वृत्तपत्रे, टेलिव्हिजन, चित्रपट, नाट्य, डिजिटल माध्यमांमध्ये देखील सक्रीय आहे.
मराठी साहित्य – प्रकार
काव्यसाहित्य (Poetry): ओवी, अभंग, गझल, मुक्तछंद, कविता
गद्यसाहित्य (Prose): कथा, कादंबरी, लघुकथा, आत्मचरित्र, निबंध, आणि प्रवासवर्णन
नाटक: पारंपरिक, सामाजिक, ऐतिहासिक, प्रयोगशील
लोकसाहित्य: भारुड, लावणी, पोवाडा, गोंधळ
भारताबाहेर मराठी भाषेचे महत्व
परदेशात मराठी शिकण्याचे महत्त्व आणि गरज
परदेशात स्थायिक झालेल्या मराठी कुटुंबांमध्ये एक मोठी सांस्कृतिक आणि भाषिक पोकळी निर्माण होत आहे. पहिल्या पिढीतील लोकांना मराठी भाषा येते ते बोलतात, वाचतात, लिहितात, आणि आपल्या संस्कृतीशी नाळ जोडून ठेवतात. मात्र दुसऱ्या पिढीतील, विशेषतः परदेशात जन्मलेल्या आणि वाढलेल्या मुलांच्या बाबतीत ही नाळ हळूहळू तुटत जाते.
मराठी मुलांना येणाऱ्या अडचणी या मुलांचे शिक्षण इंग्रजी किंवा युरोपियन भाषांमध्ये होत असल्याने मराठीशी त्यांचा थेट संपर्क राहत नाही.
घरात ऐकलेली मराठी समजते, कधीकधी बोलली जातेही, पण वाचन आणि लेखनाचा सर्वस्वी अभाव असतो.
शाळा, मित्रपरिवार, टेलिव्हिजन, इंटरनेट – सर्व काही परदेशी भाषांमध्ये असल्यामुळे मराठी वापरण्याची गरजच वाटत नाही.
त्यामुळे स्वतःच्या मातृभाषेबद्दल आत्मविश्वास कमी होतो, आणि मग ती भाषा “कठीण” वाटू लागते.
हळूहळू स्वतःची ओळख, मूळ, आणि संस्कृती यांच्याशी असलेली नाळ तुटते.
ही स्थिती का धोकादायक आहे?
जर ही स्थिती अशीच पुढे चालू राहिली, तर तिसऱ्या आणि पुढच्या पिढ्यांमध्ये मराठी भाषा आणि संस्कृती पूर्णपणे हरवण्याची भीती आहे. भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नसून सांस्कृतिक वारशाची वाहक असते. जर भाषा हरवली, तर त्या भाषेमध्ये असलेले विचार, साहित्य, कला, गीते, ओव्या, परंपरा – हे सगळेही हरवते.
मातृभाषा शाळा – एक आवश्यक पाऊल
या सगळ्या पार्श्वभूमीवर परदेशात “मराठी मातृभाषा शाळा” सुरू करणे हे अत्यंत आवश्यक ठरते. अशा शाळांमध्ये:
मुलांना मराठी वाचन, लेखन आणि शुद्ध उच्चार शिकवले जातात.
कविता, गोष्टी, खेळ, गाणी या माध्यमातून भाषा आत्मसात करण्याची संधी मिळते.
मुलांचे भाषेवरील आत्मविश्वास वाढतो आणि संवादात सहजता येते.
त्याचबरोबर मुलांना मराठी संत साहित्य, इतिहास यांची ओळख करून दिली जाते.
हळूहळू मुले स्वतःच्या ओळखीशी पुनः जोडली जातात, आणि त्यांच्यात मराठी असण्याचा अभिमान निर्माण होतो.
शेवटचा विचार
मराठी भाषा शिकवणे ही केवळ भाषा जपण्याची गोष्ट नाही, ती म्हणजे संस्कृती, आत्मओळख, आणि जडणघडण यांचं रक्षण करणं आहे. परदेशात राहूनही आपली मूळ भाषा आणि संस्कृती जपता येते, हे मुलांना शिकवण्याची जबाबदारी पालकांनी आणि समुदायाने एकत्र येऊन उचलली पाहिजे.
“मराठी शाळा” ही एक अशी जागा असते जिथे मुलं केवळ नवीन भाषा शिकत नाहीत, तर आपला इतिहास, आपली कला आणि आपली ओळख पुन्हा शोधतात.